Teacher Transferred : गुरु-शिष्याचं नातं हे अतुट असतं. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असणं आवश्यक आहे, शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात जगाला ओळख करून देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे गुरु. गुरु-शिष्याच्या (Teacher-Student) नात्यात त्याग, समर्पण, प्रेम पाहायला मिळतं. याचं हे उत्तम उदाहरण हैदराबादमध्ये समोर आलं आहे. तेलंगनात एका सरकारी शिक्षकासाठी त्या शाळेतील मुलांनी जो निर्णय घेतला त्याची संपूर्ण देशात चर्चा होतेय.
विद्यार्थ्याचं शिक्षकावरच प्रेम
हैदराबादमधल्या (Hyderabad) तेलंगना इथल्या एका सरकारी शाळेत शिकवणारे शिक्षक के जे श्रीनिवास यांची बदली झाली. पण शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक आपल्याला सोडून जाणार ही गोष्टच पटली नाही. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक निर्णय घेतला. 53 वर्षांचे के जे श्रीनिवास पोनाकल गावातील सरकारी शाळेत शिकवतात. 1 जुलैला श्रीनिवास यांची बदली झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. पण सरकारी आदेश असल्याने श्रीनिवास यांना त्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक होतं. श्रीनिवास शाळेच्या बाहेर पडताच त्यांना रोखण्यासाठी मुलांना शाळेचं गेटही बंद केलं. श्रीनिवास यांनी विद्यार्थ्यांना बरंच समजवल्यानंतर अखेर त्यांना शाळेच्या बाहेर जाता आलं. पण यानंतर जे घडलं त्याची कदाचित कोणी कल्पना केली असेल.
विद्यार्थ्यांनी घेतला अनोखा निर्णय
के जे श्रीनिवास यांच्यावर विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रेम होतं. शाळेतलून बदली झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली. पालक आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक निर्णय घेतला. श्रीनिवास यांची ज्या शाळेत बदली झाली त्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलं. अवघ्या दोन दिवसात पहिली ते पाचवीपर्यंतच्या 250 विद्यार्थ्यांपैकी 133 विद्यार्थ्यांनी नव्या शाळेत प्रवेश घेतला. ही शाळा त्यांच्या गावापासून तीन किलोमीटर दूर आहे.
श्रीनिवास यांनी मानले आभार
या घटनेनंतर शिक्षक के जे श्रीनिवास यांनी विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले आहे. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा आपल्यावर किती विश्वास आहे, मी केवळ आपल्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कर्तव्य पार पाडतो, विद्यार्थ्यांना माझी शिकवण्याची पद्धत आवडते अशी प्रतिक्रिया श्रीनिवास यांनी व्यक्त केली आहे. सरकारी शाळेत आता चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत, जी मुलं शिकत नाहीत त्यांनीही शिक्षणाचा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहनही श्रीनिवास यांनी केलं आहे.
या घटनेची हैदराबादबरोबरच संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे.