कोलकाता : कोरोना काळात दारुची दुकानं बंद असल्याने मद्य विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आल्यानंतर दारुची दुकानं पुन्हा सुरु करण्यात आली. दुकानं सुरु झाल्यानंतर मद्यपींची मोठी गर्दी, मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. परंतु आता मद्य विक्रीत मोठी कमी आल्याचं चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये याचा मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकार दारुवर लावण्यात लावलेला 30 टक्के अतिरिक्त कर (Corona Tax) कमी करु शकत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उद्योग क्षेत्रातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्री वाढवण्यासाठी भारतात तयार झालेल्या विदेशी दारुवर किंमतीच्या हिशोबाने टॅक्स लावला जाऊ शकतो. दारुवरील अतिरिक्त टॅक्स 9 एप्रिलपासून लागू झाला आहे. त्यानंतरच राज्यात दारु विक्रीत घट झाली असल्याचं बोललं जात आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपनीसह (CIABC)मद्य व्यवसायातील अनेकांनी राज्यात कर कमी करण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीत खडखडाट झाल्यानंतर महसूल मिळवण्यासाठी सरकारने मद्याची दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान सरकारकडून दारुवरील टॅक्सव्यतिरिक्त कोरोनाच्या नावने आणखी एक टॅक्स लावला. त्यामुळे दारुच्या किंमती वाढल्या. लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांनी दारुची दुकानं सुरु झाल्याने ही योजना सफलही झाली. परंतु आता याचा परिणाम दारुच्या विक्रीवर होत आहे. सरकारच्या महसूलावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकार दारुवरील अतिरिक्त टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा करु शकत असल्याचा अंदाज आहे.