कोलकाता : पश्चिम बंगालमधील जय श्रीराम विरुद्ध जय बांगला वाद आणखीच चिघळलाय... भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना 'जय श्रीराम' आणि 'जय हिंद, जय बांगला'चे संदेश पाठवण्यास सुरूवात केलीय. जय श्रीराम म्हटल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खवळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्रीराम असा संदेश लिहिलेली १ हजार पोस्टकार्ड्स ममता बॅनर्जींना पाठवून दिली. तर याला प्रत्युत्तर म्हणून तृणमूल काँग्रेसच्या दमदम भागातील कार्यकर्त्यांनी जय बांगला, जय हिंद आणि वंदे मातरम् असे संदेश लिहिलेली १ हजार पोस्टकार्ड्स पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवून दिलीत.
दमदमच्या तनवर कॉलनीमध्ये १००० पोस्टकार्डवर जय बांग्ला, जय हिंद, वंदे मातरम असं लिहण्यात आलं. ही पोस्टकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यासाठी बनवण्यात आली. बंगालमध्ये 'जय श्री राम' बोलून जनतेला त्रास दिला जाऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय.
यापूर्वी सोमवारी पश्चिम बंगालचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह स्वत: काही पोस्टकार्ड बनवताना दिसले होते. यावर त्यांनी 'जय श्रीराम' लिहिलं होतं... हे पोस्टकार्ड आपण मुख्यमंत्री निवासस्थानी धाडणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत आपला खासगी मोबाईक क्रमांक जाहीर केल्याचा आरोप केला होता. 'ममता बॅनर्जी झिंदाबाद' असा मॅसेज या मोबाईल क्रमांकावर धाडण्याचे आदेश तृणमूलकडून देण्यात आलेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.