did you know Why the Week Has Seven Days : एका आठवड्यात सात वार असतात, हे अगदी शालेय दिवसांपासूनच शिकवलं जातं. किंबहुना हे वार कोणते, याची उजळणीसुद्धा घेतली जाते. सोमवारपासून सुरू होणारा आठवडा हा रविवारी संपतो आणि या सात दिवसांना मिळून एक आठवडा तयार होतो. पण, आठवड्यात सात वार/ सात दिवसच का असतात हे तुम्हाला माहितीये?
आठवड्यात 7 दिवस असतात हे निश्चित करण्यासाठी खगोलीय पिंडांचा आधार घेण्यात आला होता. सुरुवातीला मानवी संस्कृतीमध्ये ग्रह, सूर्य आणि चंद्राच्या गतीचा आधार घेत अनेक तर्कवितर्क बांधण्यात आले होते. किंबहुना अशीही धारणा आहे, की सध्याच्या इराकमध्ये असणाऱ्या बेबीलोन इथं प्राचीन काळापासूनच नागरिक खगोलीय गणनेमध्ये निष्णांत होते. इथंच पहिल्यांदा आठवड्यातील सात दिवसांचं समर्थन करण्यात आलं होतं.
बुध, शुक्र, मंगळ, चंद्र, सूर्य आणि गुरूच्या गतीला केंद्रस्थानी ठेवत इथूनच आठवड्यामध्ये सात दिवस असण्याची प्रथा प्रचलित झाली. महिन्याभरात नेमके किती दिवस असतात हे जाणून घेण्यासाठी चंद्राच्या स्थितीवर लक्ष देत यातूनच एक बाब निदर्शनास आली. ती म्हणजे दर 28 दिवसांनी चंद्र पुन्हा पूर्वपदावरच योते. यावरूनच दर महिन्यात 4 आठवडे असतात हे निश्चित झालं. इजिप्त आणि रोम यांसारख्या देशांमध्ये मानवी संस्कृतीच्या धारणेनुसार सुरुवातीला एक आठवडा 8 ते 10 दिवसांचा असे.
भारतात आठवड्याच्या दिवसांचं गणित समजून घ्यावं, तर 7 दिवसांच्या आठवड्याचं हे समीकरण सिकंदराच्या नंतरच्या काळापासून प्रचलित असल्याचं लक्षात आलं. सिकंदरनं आक्रमण केल्यानंतर ग्रीस संस्कृतीचा वेगानं प्रचार झाला आणि अशा पद्धतीनं भारतात 7 दिवसांचा आठवडा सुरू झाला. रोममध्ये शनी, चंद्र, मंगळ, गुरू या आणि अशा ग्रहांच्या नावावरून वारांची नावं ठेवली गेली. पुढे जाऊन या वारांना संडे, मंडे, फ्रायडे अशी नावं पडली. मराठीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार... अशी नावं या वारांना देण्यात आली.