2025 या नव्या वर्षात, राज्यात 22 दिवसांमध्ये 11 वाघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वन्यजीव अभ्यासक चिंता व्यक्त करत आहेत. वाघांच्या मृत्यूची नेमकी कारणं काय, या प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे. तसंच वाढलेल्या व्याघ्रसंख्येच्या संवर्धनासाठी उत्तम धोरणांची गरज व्यक्त होत आहे.
वाघाच्या डरकाळीनं अनेकांना धडकी भरते. मात्र आता वाघांच्या मृत्यूनं राज्याला धडकी भरलीय. 2025 साल उजाडल्यापासून राज्यात मृत पावलेल्या वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशभरात मृत्यू झालेल्या वाघांची संख्या 21 इतकी आहे. त्यातल्या 11 वाघांचा मृत्यू राज्यात झालाय, तोही केवळ 22 दिवसांत. एकीकडे वाघांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे त्यांचे वाढते मृत्यू चिंता वाढवणारी बाब आहे. पण याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. टायगर कॅपिटल समजल्या जाणाऱ्या ताडोबा लँडस्केपमध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे.
कधी आणि कुठे वाघांचे मृत्यू?
2 जानेवारी - ब्रह्मपुरी वनविभागात वाघाचा मृतदेह आढळला
6 जानेवारी - तुमसर वनपरिक्षेत्रात वाघाच्या मृतदेहाचे तीन तुकडे सापडले
7 जानेवारी - उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला
8 जानेवारी - देवलापार वनपरिक्षेत्रात बछड्याचा मृतदेह आढळला
9 जानेवारी - ताडोबा बफर क्षेत्रात बछड्याचा मृतदेह आढळला
14 जानेवारी - गोंदिया वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू
15 जानेवारी - देवलापार वनपरिक्षेत्रात नवेगावात बछड्याचा कुजलेला मृतदेह आढळला
19 जानेवारी - बल्लारशाह- गोंदिया मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू
20 जानेवारी - ताडोबाच्या शिवनी वनपरिक्षेत्रात जखमी बछडा मृतावस्थेत आढळला
22 जानेवारी - पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघाचा मृत्यू
22 जानेवारी - समुद्रपूर वनपरिक्षेत्रात वाहनाच्या धडकेत वाघाचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी वन परिक्षेत्रामध्ये मृत वाघ आढळला. या मागची कारणं शोधायला वन कर्मचा-यांनी शोध मोहीम सुरू केली. वर्धामध्ये रस्ता ओलांडताना वाघिणीचा मृत्यू झाला होता तर एक्सप्रेसच्या धडकेत एका वाघानं जीव गमावला होता. काही वाघांचे मृत्यू वन्यपरिक्षेत्राच्या बाहेरचे आहेत. अवैध शिकार, रेल्वे अपघातांसह विविध कारणांमुळे वाघ मृत्युमुखी पडत आहेत. यावर वाघांच्या मृत्यूची चौकशी केली जाईल, असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय. तर वाघांच्या मृत्यूसत्राबाबत वन्यजीव अभ्यासकांनी वन विभागाला जबाबदार धरलं आहे. एकीकडे वाघांची संख्या वाढतेय मात्र कॉरिडॉर सहाच आहेत. त्यामुळे विदर्भात आणखी कॉरिडॉर वाढले पाहिजेत, असा सूर आळवला जातोय. तसंच असलेले कॉरिडॉर संरक्षित केले पाहिजेत, अशीही मागणी होतेय.
व्याघ्र पर्यटनाला महत्त्व देत असतानाच वाघांच्या संरक्षणासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे. त्यासाठी गरज आहे, ती सरकारनं सर्वंकष धोरण आखण्याची गरज.