Jalgaon Train Accident: कर्नाटक एक्स्प्रेसने पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना चिरडलं; 11 जण ठार, 'ती' एक चूक नडली

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका एक्स्प्रेसने दुसऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना धडक दिली आहे. पाचोरा स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 22, 2025, 07:31 PM IST
Jalgaon Train Accident: कर्नाटक एक्स्प्रेसने पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना चिरडलं; 11 जण ठार, 'ती' एक चूक नडली title=

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एक्स्प्रेसने काही प्रवाशांना धडक दिली आहे. पाचोरा स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून उडी मारली. याच दरम्यान समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं आहे. यामध्ये आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

जळगावमध्ये मोठा आणि विचित्र रेल्वे अपघात घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अचानक ब्रेक मारल्यामुळे पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागली अशी अफवा पसरली. आगीच्या भीतीने आपला जीव वाचवताना प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या. मात्र यावेळी याच ठिकाणी समोरून आणखी एक रेल्वे येत असल्याचं प्रवाशांना दिसलं नाही. या कर्नाटक एक्स्प्रेसने उड्या मारणाऱ्यांना धडक दिली आणि एकच गोंधळ उडाला.

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेस जळगावमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघाली होती. परांडा स्थानकाआधी ट्रेन थांबली होती. यावेळी काही प्रवासी खाली उतरले. त्यावेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने धडक दिली. यामुळे काही प्रवाशांना इजा झाली आहे. भुसावळमधून वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासनालाही कळवण्यात आलं आहे. 

"पुष्पक एक्स्प्रेस भुसावळ येथून मुंबईकडे येत असताना कामकाज सुरु असल्याने थांबा घेतला होता. कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला गाडी थांबवली, तर तिथे प्रवाशांना सूचना देऊन कळवलं जातं. पण एका शेतात गाडी थांबली. परिणामी प्रवासी खाली उतरुन गाडी कधी सुरु होईल याची वाट पाहत होते. दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने मनमाडकडून भुसावळला जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने कोणताही हॉर्न न देता तेथून गेली. 9 ते 10 प्रवाशांना जागीच उडवलं. ते सर्वजण ट्रेन सुरु होण्याची वाट पाहत ट्रॅकवर बसले होते. 12 प्रवाशांना पाचोऱ्यात रुग्णालयात दाखल केलं आहे. यामध्ये नक्कीच संवादाचा अभाव दिसत आहे," असं माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितलं आहे.  

देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.