सत्ता संघर्षानंतर माजी कृषिमंत्री दादा भुसे मतदार संघातुन गायबच ..

भुसेच्या मतदार संघात मोर्चेबांधणी..लवकरच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ...?

Updated: Jul 21, 2022, 02:57 PM IST
सत्ता संघर्षानंतर माजी कृषिमंत्री दादा भुसे मतदार संघातुन गायबच .. title=
शिंदे गटात शामिल झालेले मालेगावचे आमदार दादा भुसे

निलेश वाघ, मालेगाव- राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांची साथ सांगत करणारे तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे अद्यापही जाहीररीत्या समोर येतांना दिसत नाही. वा त्यांनी मतदार संघात कुठला कार्यक्रम घेतला ना कोणाची भेटही घेतली. त्यामुळे दादा भुसे मतदार संघातून गायब असल्याचे चित्र दिसत आहे. भुसे यांच्या अचानक गायब होण्यामागे नेमके काय दडले असे एक ना अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

पुर्वीच्या दाभाडी व आताच्या मालेगाव बाह्य मतदार संघातुन बलाढ्य हिरे घराण्याची वर्षानुवर्षाची सत्ता उलथून लावत गेल्या 4 टर्म भुसे या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे ते नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे महत्वाचे नेते मानले जायचे. मातोश्रीवर त्यांचे चांगले वजन असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर सुरवातीला राज्यमंत्री तर दुसऱ्या टर्ममध्ये कृषीमंत्रीपदाची जबाबदारी टाकली. मात्र सत्ता संघर्षात भुसे हे थेट एकनाथ शिंदे गटात दाखल झाले...

दादा भुसे मतदार संघातून गायब...

सत्ता संघर्षाला आता जवळपास महिना उलटून गेला मात्र दादा भुसे अद्यापही मतदार संघात जाहीररित्या भेटतांना दिसत नाही किंवा घराबाहेरही पडत नसल्याने एकंदरीत ते मतदार संघातून गायब झाले आहे. मुंबईत आल्यानंतर ते घरात राहणेच पसंत करत आहे. तर प्रसिद्धी माध्यमांसमोरही येतांना दिसत नाही. भुसे मतदार संघातुन गायब का राहताहेत याबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जात आहे.

मतदार संघावर भुसेंचा प्रभाव ...

सत्ता संघर्षानंतर राज्यात शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलने केली. मात्र मालेगावमधील शिवसैनिकांनी भुसे यांच्या विरोधात साधा ब्र शब्द देखील काढला नसल्याने अद्याप तरी मतदार संघावर भुसे यांची पकड दिसत आहे.

भुसेविरुद्ध सुप्त हालचाली सुरू ..

दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने पक्षबांधणीला सुरवात केली असून नाशिक जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा धडाका लावला आहे. मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य व नांदगाव मतदार संघ जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्यावर सोपविण्यात आली असून, शिंदे गटाला साथ देणाऱ्या नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात शिवसेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मात्र भुसे यांच्या मालेगावमध्ये अद्यापही कोणावर जबाबदारी टाकण्यात आलेली नाही. असे असले तरी मालेगावातील जुने निष्ठावान शिवसैनिक आता एकवटायला लागले असून  पक्षाच्या जिल्हा बैठकांना कार्यकर्ते हजेरी लावत आहेत. लवकरच मालेगावच्या शिवसेनेची कार्यकारणी घोषित  होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर हालचाली होतील गतिमान

दरम्यान सत्तासंघर्षानंतर युवा सेनेचे प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या (21 जुलै) प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहे. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या हालचाली गतिमान झाल्या असून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या मनमाड येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मालेगावातील शिवसैनिक हजेरी लावण्याचीही शक्यता असून भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाची जबाबदारी निश्चत होण्याची अटकळ बांधली जात आहे.