'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आलीये.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 6, 2024, 06:35 AM IST
'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य title=
अजित पवारांवर साधला निशाणा (फाइल फोटो)

Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या लोकापर्ण सोहळ्यानंतर जाहीर भाषणामध्ये थेट शरद पवारांचा उल्लेख न करत अजित पवारांनी वयाच्या मुद्द्यावरुन टीका केली. अजित पवारांनी "चार दिवस सासूचे झाल्यानंतर चार दिवस सुनेचे असतात ना?" असं म्हणत 'वायाच्या सत्तरी'चा उल्लेख केला. मात्र आता या टीकेवरुन शरद पवारांच्या पक्षातील आमदाराने अजित पवारांचा इशारा पंतप्रधान मोदींकडे असल्याचा खोचक टोला लगावत, अजित पवारांचं लक्ष पंतप्रधान पदावर असल्याच सूचक विधान केलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांचा लोकापर्पण सोहळा पार पडला. यावेळी अजित पवारांनी थेट नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला. "तुम्ही आता वयस्कर झालात. कोणावर तरी जबाबदारी द्या ना! कधी देणार? आम्ही म्हतारे झाल्यावर? काळानुरुप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70 च्या पुढे गेल्यावर जबाबदारी पोराच्या हातात देतो ना? म्हणतो ना, आता सूनबाई आणि पोरांनो तुम्ही करा. तुम्ही माझ्या डोळ्यासमोर शिका. पण काही काही जण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला? दुसऱ्याला चांगलं जमाणार नाही? अरे आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं देऊन दाखवलं ना? आम्ही जे बोलतो ते करतो. मला कोणाचा अपमान करायचा नाही. त्यांनी कारखाना उभा केला आम्हाला आदर आहे. त्याचं आम्हाला कौतूक आहे. पण काळानुरुप, जसे चार दिवस सासूचे असतात तसे चार दिवस सूनेचे यायचे की नाही? का ती सून म्हतारी होईपर्यंत तसच वागत बसायचं?" असं म्हणत उघडपणे नाराजी व्यक्त केली. 

या आधीही अजित पवारांनी वयावरुन केलीये टीका

यापूर्वीही अजित पवारांनी अशी नाराजी बोलून दाखवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर एका भाषणामध्ये अजित पवारांनी, "भाजपामध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं. अडवाणी, मुरली मनोहर जोशींचं उदाहण घ्या. वय 82-83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशिर्वाद द्या ना," असं म्हटलं होतं. तसाच संदर्भ आता त्यांनी पुन्हा दिला आहे. याच संदर्भावरुन आता शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या या 'सूनबाई' टीकेचा रोख पंतप्रधानांकडे असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय म्हणाला शरद पवारांचा आमदार?

अजित पवारांच्या विधानावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी, "आज अजित दादांनी वक्तव्य केलं आहे की, सत्तरीच्या घरात गेल्यानंतर वडीलधारी जबाबदारी सोपवतात. मला प्रसारमाध्यमातून कळालं की ते पवारांबद्दल (शरद पवारांबद्दल) बोलत आहेत. पण मला नाही वाटत ते पवारांबद्दल बोलले. त्यांचा इशारा मोदींकडे असेल कारण मोदी सुद्धा 75 वर्षांचे झाले आहेत," अशी खोचक प्रतिक्रिया आव्हाड यांनी नोंदवली. पुढे बोलताना, "अजितदादा नेहमी मोठी स्वप्नं बघतात त्यामुळे सत्तरीच्या पुढे गेलेला माणूस जबाबदारी सोपवतो म्हणजे कदाचित पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी त्यांची इच्छा असेल," असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.  

"आता त्यांचे वडीलधारी मोदीच आहेत. त्यामुळे वडीलधाऱ्यांनी जबाबदारी सोपवावी हा उत्तम सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे. ज्या पद्धतीने (शरद) पवार काम करत आहेत ते चाळीशीच्या माणसाला देखील लाजवेल त्यामुळे हा सल्ला नेमका मोदी साहेबांना आहे कि कोणाला आहे?" असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.