अमरावती: राज्यात कोरोनाचा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याची तयारी सुरू असताना आता अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाचं थैमान सुरू असून रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून अमरावती शहर, अचलपूरमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन आता 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र असं असतानाही अनेकांकडून नियमांचं उल्लंघन करण्यात येत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अंजनगाव सुर्जी शहरात कंटेमेन्ट झोन घोषित करण्यात आला आहे. आणखीन कडक निर्णय या 8 दिवसांची परिस्थिती पाहून घेणार असल्याचं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेश दिले आहेत.
दुसरीकडे नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज आणि उद्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच आवाहन प्रशासनानं केलं. बाजारपेठांसह , हॉटेल रेस्टॉरंट, दुकान नागपुरात बंद राहणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा नागपुरात हजारच्या पुढे गेलेला आहे.. त्यामुळं कोरोनाची चिंता वाढत चालली आहे.
दरम्यान नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी रस्त्यावर उतरून लोकांना कोरोनाबाबत नियम पाळण्याचं आवाहन केलं. इतवारी भाजी बाजार परिसरात त्यांनी अनेकांना मास्कबाबत सूचना केल्या.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आल्यानंतर आता औरंगाबादबरोबरच आता जालना जिल्ह्यातही शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून, 31 मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.