भोस्ते घाट स्वप्नातील मृतदेह प्रकरण: अचानक प्रकट झालेला 'तो' तरुण बेपत्ता; गूढ अधिक वाढलं

Bhoste Ghat Mysterious Dead Body Case Takes New Turn: डोंगरात मृतदेह असलेल्या व्यक्ती माझ्या स्वप्नात येऊन मदत मागते असं सांगत हा तरुण 17 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये आला होता.

प्रणव पोळेकर | Updated: Sep 30, 2024, 01:59 PM IST
भोस्ते घाट स्वप्नातील मृतदेह प्रकरण: अचानक प्रकट झालेला 'तो' तरुण बेपत्ता; गूढ अधिक वाढलं title=
पोलिसांनीच दिली माहिती

Bhoste Ghat Mysterious Dead Body Case Takes New Turn: खेडमधील भोस्ते घाटातील मृतदेह प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे. उलघड झाला. सावंतवाडीतील तरूणाला पडलेल्या स्वप्नानंतर पोलिसांना खरोखरच मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणाचा उलगडा ज्या तरुणामुळे झाला तो तरुणच फरार झाला आहे. या तरुणाने फरार होण्यापूर्वी पोलिसांना एक चिठ्ठी दिली असून आता पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरूणाने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये प्रचंड तफावत असल्याचं समोर आलं होतं. एकीकडे मृताची ओळख पटण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू असतानाच दुसरीकडे हा तरुण गायब झाल्याने पोलिसांची डोकेदुखी अधिक वाढली आहे.

तो तरुण बेपत्ता; सोडून गेला चिठ्ठी

भोस्ते घाट प्रकरणाला वाचा फोडणारा योगेश आर्या हा तरुण शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनीच दिली असून सध्या पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरू आहे. मृत व्यक्ती स्वप्नात येत असल्याचा योगेश आर्याचा दावा होता. पोलिसांनी त्याच्या दाव्यानुसार शोध घेतल्यानंतर घटनास्थळी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरमात योगेश आर्याची देखील चौकशी केली होती. मात्र अचानक योगेश आर्या फरार झाला आहे. दुसरीकडे योगेश आर्याच्या शोधासाठी त्याचे वडील पोलीस अधीक्षक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.  फरार होण्यापूर्वी योगेश आर्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पण या चिट्टीत नेमके काय लिहिलेलं आहे याबाबत पोलिसांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

नेमकं घडलं काय?

सावंतवाडीतील आजगांव येथे राहणाऱ्या योगेश पिंपळ आर्याने, "खेड भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा," असे सांगत पोलिसांकडे धाव घेतली. 17 सप्टेंबरला याबाबत आर्याने खेड पोलीस ठाण्यात तशी खबर दिल्यानंतर पोलिसांनी याची नोंद एफआयआरमध्ये सुद्धा केली. स्वप्नात आलेल्या त्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आपण खेडमध्ये आलो होतो असं आर्याने पोलिसांना सांगितलं. त्या दरम्यान त्यानं इन्स्टाग्रामवरही काही व्हिडिओ शेअर केले. त्यामध्ये त्यानं काही माहिती दिल्याचे समजते. पोलिसांनी एकुणच त्याच्या प्रवासाबाबत आणि स्वप्नाबाबत विचारणा केली असता, "आपण खेडमध्ये त्या मृतदेहाच्या शोधासाठी आलो होतो. परंतु मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुद्धीत आलो, तर मी सुरतमध्ये होतो. तेथे काही फोटो काढले. त्यानंतर पुन्हा प्रवासात मला जेव्हा जाग आली तेव्हा खेड रेल्वे स्थानकाचा बोर्ड दिसला," असा दावा आर्याने केला होता. त्यानंतर खेडमध्ये उतरल्यावर मी चार दिवस मृतदेहाच्या शोधत असल्याचे योगेशने पोलिसांना सांगितले. त्याच्या जबाबत वारंवार होणार बदल आणि वस्तूस्थिती यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार बोगस असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी धडपड सुरू असून खेड, गोवा, सिंधुदुर्गमधील बेपत्ता झालेल्यांची पोलिस माहिती घेत आहेत. 

मानसोपचार तज्ज्ञांकडून चौकशी करण्याचा होता विचार पण...

गोव्यात खासगी कंपनीत आर्या काम करत होता. मित्रांबरोबर तो गोव्यात राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी गोव्यातही त्याची चौकशी केली. तेव्हा एकतर्फी प्रेमातून त्याच्यावर काहीसा मानसिक परिणाम झाला होता. त्यामुळे त्या मुलीला प्रभावीत करण्याच्या दृष्टीने त्याने काही प्रकारही केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. तो सात दिवस गायब होता. तेव्हा त्या मुलीवर याचा काय परिणाम झाला असेल का, असे देखील तो मित्राला विचारत होता. त्यामुळे पोलिसांना आर्याचा मासोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्वप्नाचे आणि जंगलातील मृतदेहाचे गूढ कायम आहे. आर्याला पब्जी गेम खेळण्याची सवय आहे. इन्स्टाग्रामवर टास्क संदर्भात काही व्हिडिओ त्याने शेअर केले आहेत. त्यामुळे हा टास्कचा एखादा प्रकार तरी नाही ना, याचा तपासही पोलिस करत आहेत. आर्याची मानसोपचार तज्ज्ञांकडून चौकशी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु होता. मात्र त्यापूर्वीच तो बेपत्ता झाल्याने पोलिसांचं टेन्शन अजून वाढलं आहे.