विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड : आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचपार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा भाजपने केली आहे. 50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. याचदरम्यान या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या अभियानाच्या निमित्ताने पंकजा मुंडे बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी गेल्या आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं.
"राजकारणात माझ्यासोब दगाफटका झाला, माझा वनवास झाला, तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली भावना अनेक वेळा व्यक्त केली. त्यानंतर सगळं काही अलबेला असल्याचं पंकजा मुंडे यांच्याकडून दाखवण्यात आलं. मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी आपल्यासोबत दगा फटका झाल्याचं जाहीर भाषणात सांगितले.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत पंकजा मुंडेंनी बीड तालुक्यातील नारायण गड येथे नगद नारायणाचे दर्शन घेऊन अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर पौंडूळ गावात पंकजा मुंडेंनी रात्रीचा मुक्काम केला. मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती पंकजा मुंडे यांनी घेतली आहे
तर माध्यमांशी साधलेल्या संवादा दरम्यान पंकजा मुंडेंनी राज्यसभेच्या उमेदवारी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं. यात नाविन्य असं काही नाही. लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे
दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंना खांद्याला दुखापत झाली होती. याविश्रांतीनंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात दाखल झाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रकृतीबाबत सांगितले लोकांमध्ये आल्यावर मी कधीच माझं दुःख दाखवून देत नाही. ब्रीच कँडी रुग्णालयात एमआरआय केला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपी झाली आहे. तीन आठवड्यानंतर प्रकृती ठीक झाली नाही तर मात्र सर्जरी करावी लागेल. असं पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.