लातूर : लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर काल रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांचं नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. ते १०४ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांचं पार्थिव लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर इथल्या 'भक्ती स्थळ' या ठिकाणी आणण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर दफनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनामुळे निधन झाल्याने मोजक्या अनुयायांच्या, भक्तांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी पार पडला. मृत्यूपूर्वी महाराजांनी घोषित केलेले अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी राजशेखर विश्वंभर स्वामी यांनी महाराजांची आरती केली. यावेळी हडोळती मठाचे अभिषेक स्वामी, लिंगायत धर्मगुरू, भाजपचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्यासहित अनेकांची उपस्थिती होती. शासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीस पथकाने मानवंदना देत हवेत तीन वेळा फैरीही झाडल्या.
बाळासाहेब थोरात
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विरशैव परंपरा खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र शास्त्रोक्त पद्धतीने रुजवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामध्येही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या निधनाने विरशैव समाजाचा दीपस्तंभ हरपला, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते पण या क्षेत्रात त्यांचे मन रमले नाही. विरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी दोनवेळा तुरुंगवासही भोगला..
विरशैव तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत, उर्दू, मोडी, पारसी, इंग्रजी, कन्नड, मराठी अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभृत्व होते. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. धार्मिक, सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही शिवाचार्य महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गाव खेड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवली. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे त्यांच्या कार्यातून लिंगायत समाजाच्या कायम स्मरणात राहतील, अशी श्रद्धांजली थोरात यांनी अर्पण केली.
धनंजय मुंडे
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. अहमदपूरकर महाराज यांचे नुकतेच निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय १०४ वर्षे होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रासह विविध राज्यातील त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.
अशोक चव्हाण
वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले. लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला. वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले. सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दीप आता मालवला आहे” या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.