विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादेत सध्या काही मुलींना एसएमएस करून त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर आलाय, धक्कादायक म्हणजे सतावणा-यांचे नाव त्यात येत नाही, तर काही ठिकाणी ओळखीच्या लोकांचीच नाव त्यात आली. या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे कऱण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्याचं पुढं आलं आहे.
औरंगाबादच्या एका मोठ्या कंपनीत काम करणा-या मुलीला एक मॅसेज आला. तो मॅसेज अश्लील होता. धक्कादायक म्हणजे तिच्या बॉसच्या नंबरवरुन तो मेसेज आला होता. तिनं बॉसला जाब विचारला. बॉसविरोधात तक्रार केली. पण बॉसने तो मेसेज पाठवलाच नव्हता.
पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेनं तपास केला आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला. एसएमएस बॉसने नाही तर एका बेवसाईटवरुन करण्यात आला होता.
गुगल प्लेस्टोअरवरही अशी काही अॅप्स उपलब्ध आहेत. ज्यावरुन तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या कुणाच्याही नावानं तुम्हाला मेसेज करता येतो. धक्कादायक म्हणजे सबंधित अॅपकडे पाठवणा-याचा नंबर मागितला तर पैशांची मागणी सुद्धा होते.
एकाच्या नावानं दुसऱ्याला त्रास देण्याचा तिसऱ्याचा खेळ सुरू आहे. सावध राहा, आणि कुठलाही मेसेज आला तर तो नक्की कुणी पाठवला आहे. याची खात्री नक्की करुन घ्या. संशयास्पद वाटलं तर पोलिसांमध्ये तक्रार करा, तरच अशा अॅपना आळा घालणं शक्य होईल.