नागपूर : हिंगणघाट हत्याकांडाचा आरोपी विकेश नगराळेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. नागपूरच्या कारागृहात विकेशने हा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात होतं. पण पोलीस प्रशासनाने हे वृत्त फेटाळलं आहे. विकेश नगराळेने शिक्षिकेवर भररस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
3 फेब्रुवारी रोजी प्राध्यापिका तरूणी कॉलेजला जात असताना हिंगणघाट चौकाजवळ ही घटना घडली. तरूणीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं. यामध्ये तरूणी 40 टक्के भाजली होती. मात्र चेहरा पूर्णपणे भाजला होता. उपचारादरम्यान या तरूणीचा 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला.
आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नागपूरच्या कारागृहात विकेशची रवानगी करण्यात आली. येथे विकेशन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. विकेशने ब्लॅंकेटच्या चिंधीने गळफास लावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. मात्र, जेल चे सुप्रीटेंडेंट आणि इतर अधिकारी मात्र ही कोरी अफवा असल्याचं सांगत आहेत.
थंडीपासून बचाव करण्यासाठी विकेशला ब्लँकेट देण्यात आले आहे. हे ब्लँकेट फाडून त्याच्या चिंधीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा विकेश नगराळेने प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र कारागृह प्रशासनाने असं काहीही झालेलं नाही असं स्पष्ट केलं आहे. विकेश नगराळे जेलमध्ये 24 तास सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली आहे. तो एकदम सुरक्षित आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.