रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर महाराष्ट्राला मिळाले नवे पोलीस महासंचालक

IPS Sanjay Verma: महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक बनवण्यात आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Nov 5, 2024, 05:25 PM IST
रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर महाराष्ट्राला मिळाले नवे पोलीस महासंचालक title=
आयपीएस संजय वर्मा

IPS Sanjay Verma: महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक बनवण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रश्मी शुल्का यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर ही जागा रिक्त होती. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर डीजीपी हे पद अत्यंत महत्वाचे आहे. 

कोण आहेत संजय वर्मा? 

संजय वर्मा हे 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या कायदा आणि तंत्रज्ञानचे डीजी म्हणून कार्यरत आहेत. संजय वर्मा एप्रिल 2028 मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होतील. आयपीएस संजय कुमार वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी बीए मॅकेनिकलचे शिक्षण घेतले आहे. संजय कुमार वर्मा यांचा जन्म 23 एप्रिल 1968 रोजी झाला. 

कोण आहेत रश्मी शुक्ला?

रश्मी शुक्ला यांची काही दिवसांपुर्वी बदली करण्यात आली. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगात त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. आयोगाकडून याची दखल घेण्यात आली. दरम्यान रश्मी शुक्ला कोण आहेत हे जाणून घेऊया. पुण्याचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी म्हणून काम पाहिलंय. त्यानंतर त्यांची राज्य गुप्तचर विभागात (SID) आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्याचवेळी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाला होता. फोन टॅपिंग प्रकरण त्यावेळी बाहेर आलं होतं.

फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय?

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांचं नाव घेतलं जातं. रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागात आयुक्तपदावर असताना बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. फडणवीस सरकार सत्तेत असताना आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देखील बेकायदेशीर फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करण्यात आले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.बीकेसी सायबर पोलिसांनी 26 मार्च 2021 रोजी अधिकृत गुपित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि लीकची चौकशी सुरु केली. त्यावेळी मार्च 2022 मध्ये सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवला गेला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 24 जणांचे जबाब नोंदवले आहेत. सीबीआयने दंडाधिकार्‍यांसमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर त्यांना रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील मुंबई आणि पुण्यातील गुन्हे रद्द करण्यात आले आहेत.