सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट करत म्हटलं...

Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Updated: Oct 13, 2024, 01:10 PM IST
सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट करत म्हटलं... title=
Lawrence Bishnois Gang Claims Responsibility For Baba Siddiques Murder writes Fb Post

Baba Siddique Death News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर येत होते. अखेर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी घेतली आहे. शुब्बु लोणकर नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्ट करत जबाबदारी घेतली आहे. तसंच, या फेसबुक पोस्टमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचेही नाव घेण्यात आले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. 

बाबा सिद्दीकी हे राजकीय नेते असले तरी अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. सलमान खान, शाहरुख खान यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होती. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच लॉरेन्स बिश्नोईवर संशय व्यक्त करण्यात येत होता.

आता शिब्बू लोणकर या फेसबुक आयडीवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. यात त्यांनी हत्येची जबाबदारी घेतली आहे. मात्र, झी 24 तास या फेसबुक पोस्टची पुष्टी करत नाही. 

पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तु आमच्या भाईचं नुकसान केलंस. आज जे बाबा सिद्दीकी यांच्या सभ्यतेचे कौतुक करण्यात येतंय. तेच एकेकाळी दाउदसोबत मकोका अॅक्टमध्ये सामील होता.  त्यांची हत्या करण्याचं कारण अनुज थापन आणि दाऊनला बॉलिवूड, राजनीती आणि प्रॉपर्टी डिलिंगमध्ये जोडणं... आमची कोणासोबतच दुश्मनी नाहीये. पण जे लोक सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करतील त्यांना हिशोब चुकता करावा लागेल. आमच्या कोणत्याची भावाला नुकसान पोहोचवलत तर आम्ही प्रतिक्रिया जरुर देणार. आम्ही पहिले वार कधीच केला नाही. 

या पोस्टनंतर लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई असे काही हॅशटॅग देण्यात आले आहेत. तसंच, या पोस्टमधून थेट एक प्रकारे सलमान खान याच्यावर निशाणा साधण्यात आल्याचे कळतंच. शिब्बु लोणकर नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींनीही लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता या प्रकरणात पोलिस काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पोस्टची सत्यता पडताळणार

ज्या पोस्टवरुन हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. त्या पोस्टची सत्यता तपासण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून केंद्रीय तपास यंत्रणांकडून या पोस्टची पडताळणी करण्यात येत आहे.