राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह ; अनेक उपक्रमांचे आयोजन

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. 

Updated: Jun 16, 2019, 07:53 AM IST
राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह ; अनेक उपक्रमांचे आयोजन title=

मुंबई : राज्यभरात आज वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात येत आहे. सात जन्म हाच पती मिळावा म्हणून महिला हा व्रत करतात. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा १६ जून म्हणजेच आज वटपौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. आजच्या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या दिवशी हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो, अशी धारणा महिला वर्गात रुढ आहे. त्यामुळे महिला वट पौर्णिमेच्या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. 

ठाणे शहरात यंदा फणसाची आवक घटल्यामुळे फणसाच्या किंमती वधारल्या आहेत. आज वटपौर्णिमेनिमित्त फणसाला मोठी मागणी असते. मात्र यंदा कोकणात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे फणसाच्या झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात यंदा फणसाची आवक घटली असून, फणसाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय. 

वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाची फांदी तोडून पूजा करण्यापेक्षा नवी मुंबई महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला. तो म्हणजे वडाची झाडं लावण्याचा. महापालिका कर्मचारी महिलांनी महापालिकेच्या आवारात वडाची, आंब्याची आणि चाफ्याची झाडं लावून अनोखी वटपौर्णिमा साजरी केलीय.  

पत्नीपीडित पुरुषांच्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा

औरंगाबाद शहरात पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत आहेत. नवरा - बायको समान असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्यांच्यात भांडण झालं की चूक कोणाची का असेना शिक्षा मात्र पुरुषांना मिळते. महिलांच्या चुकीची शिक्षा पुरुषांना भोगावी लागते. त्यात कायदे देखील फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचं म्हणणं कोणी ऐकत नाही असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला. 

पुढील सात जन्म हाच नवरा मिळूदे म्हणून महिला वर्ग वडाच्या झाडाला साकडं घालतात. मात्र पुढच्या जन्मात तरी अशी बायको देऊ नको, अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादच्या वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या. यमराजाकडे आपले मनोगत व्यक्त केले.