शिरुर : लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचार रणधुमाळीत शिवसेना - भाजपच्या टार्गेटवर आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार... महाराष्ट्रातील सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात शरद पवारांवरच निशाणा साधला होता. राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या या टीकेला जशास तसं प्रत्यूत्तर दिलंय.
'माझी विनंती आहे... ज्यांनी कधी आयुष्यात मैदान पाहिलं नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये' असं म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणलाय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पवारांवर 'पराभव दिसल्यानं मैदान सोडलं' असं म्हणत टीका केली होती. याला उत्तर देताना, 'तुम्हाला पाहायचंच असेल तर एकदा मैदानात या, तुमच्यासाठी शेरेवाडीचा पैलवानच खूप झाला...' असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय.
शिरुर मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
दरम्यान, 'राष्ट्रवादीच्या कॅप्टननी पॅड बांधले, डोक्याला हेल्मेट लावलं, हातात ग्लोव्ह्ज घातले, बॅट हातात घेतली आणि माढाच्या पिचवर उतरले. मीच ओपनिंग बॅट्समन आहे, आता सेंच्युरी मारतो, असं म्हणाले. पण समोर मोदींची गुगली दिसल्यावर साहेब म्हणाले आता मी खेळतच नाही', असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर टीका केली होती.