Maharashtra Assembly Election: घरबसल्या शोधा मतदारयादीतील नाव, जाणून घ्या Step By Step संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. अशावेळी मतदार यादीत नाव कसं शोधायचं, वाचा सविस्तर

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 21, 2024, 08:28 AM IST
Maharashtra Assembly Election: घरबसल्या शोधा मतदारयादीतील नाव, जाणून घ्या Step By Step संपूर्ण प्रक्रिया title=
Maharashtra Assembly Election voter list A step by step guide to search your voter ID using EPIC number name

Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुक जाहीर होताच मतदार मतदार यादीत नाव शोधण्याची धावपळ करतात. पण आता जिल्हा प्रशासनाने मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे, मतदान केंद्र शोधणे अगदी सहज सोपे व्हावे, यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप, टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. 

'वोटर हेल्पलाइन अॅप' या अॅप्लिकेशनद्वारे नागरिकांना मतदारयादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती आदी सुविधा उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. मतदारांच्या सोयीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला  आहे. या क्रमांकाचा फायदा नागरिकांना घरबसल्या करता येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

तसंच, https:// electoralsearch.eci. gov. in या मतदाराचा संकेतस्थळावरदेखील तपशील शोधता येणार आहे. वोटर हेल्पलाइन अॅपवरदेखील ही सुविधा आहे. या अॅपमुळे मतदारांना आपली नावे आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत होणार आहे. राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान; तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे मतदार म्हणून नावनोंदणी केलेली असल्यास आपले नाव असल्याची खात्री आताच करणे गरजेचे आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून, तसेच मतदार हेल्पलाइन मोबाईल अॅपवरून हे तपासता येणार आहे. याचा लाभ राज्यातील नवमतदारांना अधिक प्रमाणात होणार आहे. त्यामुळे मतदारांचा वेळ वाचणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ३६ विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी १० विधानसभा मतदारसंघ हे मुंबई शहर जिल्ह्यात आणि २६ विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिकेच्या ४ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी, उपनगर व शहर यांना अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.