Badlapur Case : बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटलेत. बदलापूरच्या नामांकित आदर्श शाळेत नराधमाने चार दिवसात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) केला. शाळेत शिकणऱ्या दोन चिमुरड्यांना तिथेच काम करणाऱ्या एका शिपायाने वासनेचा बळी बनवलं. एक चिमुकली चार वर्षांची तर दुसरी सहा वर्षांची आहे. या प्रकरणी शिंदे सरकारने (Shinde Government) एसआयटीची (SIT) स्थापना केली आहे. बदलापूरच्या या शाळेत आरोपी अक्षय शिंदे कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू झाला होता. या हैवानानं चिमुरड्या मुलींच्या अजाणतेपणाचा फायदा घेत त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. या नराधमानं चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. 12 ऑगस्टला एका मुलीने तिच्या पालकांकडे तक्रार केली. शु करण्याच्या जागी मुंग्या चावतायत असं या चिमुरडीचं वाक्य होतं. त्याच वर्गातली दुसरी मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं समोर आलं.
शाळेवर प्रशासकाची नियुक्ती
बदलापूर प्रकरणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. बदलापूरच्या शाळेवर प्रशासक नेमण्यात आला असून गुरुवारी सकाळी प्रशासक शाळेचा ताबा घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीये. शिक्षण विभागाला जी कारवाई करायची होती ती कारवाई पूर्ण झाल्याचंही केसरकर यांनी सांगिलं. समितीचे अधिकार काढून प्रशासकाकडे देण्यात आल्याचंही केसरकर म्हणालेत. त्याचबरोबर गुन्हा दाखल करणं हा पोलिसांचा भाग असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
तपासासाठी SIT ची स्थापना
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काल पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. याप्रकरणी SIT टीम स्थापन करण्यात आलीय. या टीमकडून दोन्ही पीडितांच्या घरी जाऊन दोघींच्याही पालकांचा जबाब नोंदवण्यात आला.
आंदोलकांवर कारवाई
बदलापूर प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणार जमाव रस्त्यावर उतरला. जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात उतरुन रेल्वे रोखल्या. जवळपास सात ते आठ तास या मार्गावर रेल्वे बंद होत्या. बदलापूर रेल्वे स्थानकात जमाव करणं, तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, तसंच रेल रोको आंदोलन प्रकरणी, 32 आंदोलकाना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण रेल्वे न्यायालयानं त्यांना ही शिक्षा सुनावली. त्यानंतर आरोपींना कल्याणच्या आधारवाडी कारागृहात नेत्यात आलं.
आरोपीला सहा दिवसांची कोठडी
बदलापूरमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयानं 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये.. पोलिसांनी आरोपीवर आणखी काही लैंगिक शोषण तसंच कृत्य केल्याचा संशय व्यक्त केलाय.. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मुलींना काय बोलायचा, कसा न्याययचा, त्यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार करायचा याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोपीची पोलीस कोठडी वाढवून मागीतलीये.. न्यायालयानं त्याला मान्यता देत आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये..
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
बदलापूर अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीये. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद ठेवण्याची हाक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीय.बदलापुरात झालेलं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय.. तर सरकार आरोपींना वाचवत असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.