प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड: पावसाळी दिवसांमध्ये ट्रेकिंगच्या वाटांवर अनेक वाटसरू चालू लागतात. त्यातच काही भागांना आवर्जून भेट देण्याची परंपराही अनेकजण जपतात. पण, यंदाच्या पावसाळ्यात मात्र वर्षा पर्यटनाच्या या आवडीवर काही प्रसंगी विरजण पडल्याचं पाहायला मिळालं आहे. किल्ले रायगडावर असंच एक धडकी भरवणारं चित्र पाहायला मिळालं.
मागील 48 तासांपासून कोकण आणि लगतच्या भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली ज्यामुळं अनेक गावांना लागून असणाऱ्या नद्यांची पाणीपातळी वाढली. तिथं किल्ले रायगड (Raigad Rain Video) परिसरात रविवारी दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि क्षणात चित्र बदललं.
गड परिसरात झालेल्या पावसामुळं किल्ल्यावरून विविध दिशांनी पाण्याचे लोट पायरी मार्गावरून वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पायरी मार्गावरून उतरताना पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, सोबत मातीची लाट त्यानं वाहून आणली होती. दरम्यान, पाऊस आणि पाण्याच्या या लोटामुळं धडकी भरलेली असतानानी किल्ल्याच्या भिंतींचा आधार घेत एकमेकांना पकडून पर्यटक कसेबसे खाली उतरले.
काहींनी संरक्षक कठड्यावर उभं राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून वहात जाण्यापासून स्वतःला वाचवलं. सुट्टीचा दिवस असल्यामुळं रायगडावर आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी होती. हे पर्यटक परतीच्या मार्गावर असतानाच हा प्रकार घडला. दुपारी साधारण 3.30 ते 4 वाजण्याच्या सुमारास किल्ले रायगड भागात अचानक पाऊस सुरू झाला, पावसाचा जोर एकाएकी इतका वाढला की, पाण्याचे लोंढे किल्ल्यावरून खाली कोसळू लागले होते काही क्षणातच पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. या संपूर्ण आव्हानात्मक स्थितीमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. या ढगफुटीसदृश्य पावसानं रायगड भागातील अनेक गावांनाही तडाखा दिल्याचं पाहायला मिळालं.