Mumbai Metro Line 9 And 7A : एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पांमध्ये विलंब होत असल्याचे दिसून आले असून, मेट्रो मार्ग 9 (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग 7 अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांसाठी नव्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश 9 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील नागरिकांना मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे या प्रकल्पांबाबत माहिती विचारली होती. त्यास उत्तर देताना कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांनी ही माहिती प्रदान केली. एमएमआरडीएची मेट्रो मार्ग 9 आणि 7 अ यास नवीन मुदतवाढ दिली गेली असून मेट्रो मार्ग 9 साठी जून 2025 तर मेट्रो मार्ग 7 अ साठी जुलै 2026 अशी नवीन डेडलाईन दिली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने दिली आहे.
मेट्रो मार्ग 9 जो दहिसर पूर्व ते मिरा भाईदर पर्यंत आहे आणि मेट्रो मार्ग 7 अ जो अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल पर्यंत आहे. या दोन्ही मार्गाचे कार्यादेश दिनांक 9 सप्टेंबर 2019 असे आहे. मेट्रो मार्ग 9 ची काम पूर्ण करण्याची तारीख ही 8 सप्टेंबर 2022 अशी होती ज्यास मुदतवाढ देत ही नवीन तारीख आता जून 2025 अशी करण्यात आली आहे. तर मेट्रो मार्ग 7 अ ची काम पूर्ण करण्याची तारीख ही 8 मार्च 2023 अशी होती ज्यास मुदतवाढ देत ही नवीन तारीख आता जुलै 2026 अशी करण्यात आली आहे.
अनिल गलगली यांच्या मते अश्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या विलंबाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध होत नाही आणि खर्चात वाढ होत असल्याने जनतेच्या करांचा पैसा वाया जातो. अश्यावेळी दंडात्मक कारवाई आणि कंत्राटदाराला काळया यादीत टाकणे योग्य होईल, असे मत गलगली यांनी व्यक्त केले आहे.