चंद्रपूर : भाजप - शिवसेना युतीचा पहिला साईड इफेक्ट चंद्रपुरात दिसणार आहे. जिल्ह्यातील वरोरा विधानसभेचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर शिवसेना सोडण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करून धानोरकर चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २-३ दिवसांत धानोरकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे. २८ फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांच्यासोबत मुंबईला यासंदर्भात बैठक झाली आहे. युती झाल्यानं धानोरकर नाराज आहेत. युती झाल्यास शिवसेनेकडून लढणार नसल्याचं धानोरकरांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातलं होतं. काँग्रेसकडून लोकसभा लढवून हंसराज अहीर यांना आव्हान देण्याची धानोरकर यांची तीव्र इच्छा आहे. युती झाल्यानंतर काही जणांमध्ये स्पष्ट नाराजीही आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आज खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपले असून त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली. आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते. आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला यावेळी सुभाष देशमुखांनी दिला.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक झाली असून अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री घेतील. उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली. शिवाय जालना लोकसभेच्या मैदानात आपण अजूनही कायम असून माघार घेतली नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलं. खोतकर आणि माझ्यातील वाद मिटले असून दोघांचं मनोमिलन झाल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.