नागपूर हादरलं! मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आईने सोडला प्राण; समोर आलं धक्कादायक कारण

Nagpur Crime : नागपुरातल्या या हृदयद्रावक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्य मृत्यूनंतर आईचेही प्राण गेल्याने कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे

आकाश नेटके | Updated: May 23, 2023, 10:54 AM IST
नागपूर हादरलं! मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आईने सोडला प्राण; समोर आलं धक्कादायक कारण title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सध्या आयपीएलचा (IPL 2023) हंगाम सुरु आहे. अनेक जण हे सामने पाहून क्रिकेटचा खेळ एन्जॉय करताना दिसत आहेत. मात्र काहींसाठी क्रिकेटचा खेळ हा पैसा कमावण्याचं साधन झालं आहे. सट्टेबाजीतून (cricket betting) अनेक जण पैसे कमावत आहेत. मात्र या सट्टेबाजीमुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. नागपुरात (Nagpur News) एका तरुणाचाही सट्ट्याच्या नादाने जीव घेतलाय. मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने आईनेही टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवले. माय लेकराच्या मृत्यूमुळे नागपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आईने केली आत्महत्या

क्रिकेट सट्ट्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा जबर धक्का बसल्याने त्याच्या आईनेदेखील विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. काही तासांच्या अंतराने आई-मुलाने आयुष्य संपविल्याने नागपुरातल्या छापरूनगर परिसरात शोककळा पसरली आहे. नागपूर पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

नागपूर शहरातील वर्धमान नगर परिसरातील आंबेडकर चौकाजवळ ही घटना घडली आहे. खितेन वाघवानी (20) असे मृतक मुलाचे नाव आहे. तर दिव्या नरेश वाघवानी असे त्याच्या दुर्दैवी मृत आईचे नाव आहे. मृत खितेनच्या वडिलांचा इतवारी परिसरात किराणा मालाचा व्यवसाय आहे. 20 वर्षीय खितेनला सुट्ट्याचा नाद लागला होता. याबाबत त्याच्या आईने त्याला फटकरलेही होते. मात्र काही केल्या त्याचा सट्ट्याचा नाद सुटत नव्हता.

गेल्या वर्षी खितेनने सट्ट्यात हजारो रुपये गमावले होते. ही बाब त्याने घरच्यांना सांगितली होती व त्याचे वडील पैसे हळूहळू देत होते. मात्र सट्टेबाजांनी पैशांसाठी त्याच्याकडे तगादा लावू लावला होता. त्यामुळे खितेन तणावात गेला. रविवारी रात्री वाघवानी कुटुंबिय एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी कुणीच नसताना खितेनने स्वयंपाकघरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील कुटुंबाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. शेजाऱ्यांनी त्याला तातडीने खाली उतरवून एका खाजगी रुग्णालयात दाखले केले.  मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची आई दिव्या यांना जबर धक्का बसला. मुलाच्या मृत्यूचा प्रचंड मानसिक धक्क्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दिव्या सकाळच्या सुमारास विषारी औषध घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले. कुटुंबीय खितेनच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना त्याच्या आईची प्रकृती खालावली. दिव्या यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना देखील मृत घोषित केले. दोघांच्याही मृत्यूमुळे खितेनचे वडील व बहीण अक्षरश: कोलमडले आहेत. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.