गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन गावकऱ्यांची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले.

Updated: Jan 22, 2019, 09:44 AM IST
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन गावकऱ्यांची हत्या title=

गडचिरोली -  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचा बदला घेण्यासाठी हे खून करण्यात आल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. तशा आशयाचा बॅनर त्यांनी घटनास्थळी लावला.

मालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू कुडयेटी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. कसनासुर गावातच २२ एप्रिल २०१८ रोजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले मिळाले होते. मालू मडावी, कन्ना मडावी आणि कुडयेटी हे तिघेही पोलिसांचे खबरी म्हणून काम करीत होते. त्यांच्यामुळे ४० नक्षलवाद्यांना प्राण गमवावे लागले. त्यासाठीच या तिघांची हत्या करण्यात आल्याचे नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनरमध्ये लिहिले आहे. दरम्यान, कसनासुर गावातून काही जणांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याचीही माहिती मिळते आहे. या घटनेमुळे गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.