पुणे : आमचं हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यात एक वर्षांपूर्वी पर्यंत काही फरक नव्हता. आमचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व नाही असे राऊतांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बिहार निवडणुक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कंगना राणौत सर्वांवर भाष्य केलंय. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर राऊतांनी भाष्य केले. एक तरुण ज्याचे कुटुंब तुरुंगात आहे, सीबीआय आणि आयटी डिपार्टमेंट मागावर आहे अशा बिहारमध्ये त्याने आव्हान स्वीकारलंय. त्यामुळे उद्या जर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यात गैर काय
याचा अर्थ ते सरकार चालवतात असा नाही. तसं नाही केलं तर आमच्या सारखे करंटे आम्हीच असे राऊत म्हणाले. शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहे.स्वबळावर भगवा फडकण्याबाबत शरद पवार जे बोलले त्यावर आम्ही बोलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार किंवा अमित शाह भीतीदायक आहेत असं मला वाटत नाही असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी कुणाला शरद पवारांकडे पाठवण्याऐवजी नरेंद्र मोदींकडे पाठवायला पाहिजे होतं असे राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल यांनी राजभवनाबाहेर येऊन राजकारण करावं असा टोला देखील त्यांनी लगावलाय.
मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली. हे सरकार पडणार नाही, हे सरकार पडेल असं दिल्लीतील कुणी म्हणत नाहीत.
राज्यातील लोक पण बोलायचं थांबले आहेत. पण हे सरकार पुढील ४ वर्षे टिकेल असेही राऊत म्हणाले.
कंगना राणावतच्या विषयाला जास्त महत्व देण्याची गरज नाही. ती संशयित आरोपी आहे, तिने पोलिसांसमोर येणं आवश्यक आहे. पण ती का येत नाही माहीत नाही असे राऊत म्हणाले.
नांदेड महापालिकेचा विषय असेल तर तो बोलून सोडवता येईल. अशोक चव्हाण हे नाराज नाहीत असे राऊतांनी स्पष्ट केले.
संभाजी राजे आणि उदयन राजे यांनी मराठा आरक्षण विषयात नेतृत्व करावं असं शरद पवार म्हणाले, तसं झालं तर आम्हीही त्यांच्यासोबत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.