अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक पिके भुईसपाट, पुढील 2 दिवस गारपिटीसह पाऊस

उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला.  पुढचे 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.  

Updated: Mar 9, 2022, 02:07 PM IST
अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक पिके भुईसपाट, पुढील 2 दिवस गारपिटीसह पाऊस title=

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या अवकाळी पावसात द्राक्षबागा, गहू, हरभरा पिकं भूईसपाट झाली आहेत. तर पुढचे 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain with hail for next 2 days at North Maharashtra, Marathwada)

राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरासह जिल्हात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरण बदलाने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा हवाल दिल झाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षाला तडे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे फळबागा, कांदा आणि गव्हला मोठा फटका बसला. अनेक शेतक-यांनी रब्बी हंगामासाठी दुबार पेरणी केली होती. मात्र अवकाळी पवसाने काढणीला आलेलं पीक नष्ट केले.

गहू आणि कांदा पिक भुईसपाट

नाशिकच्या येवला तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काढणीला आलेला गहू आणि कांदा पिक भुईसपाट झाले आहे. द्राक्षबागांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. आधीच अतिवृष्टीने खरीपाच्या पिकाचं नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकांच्या भरोशावर होता. मात्र अवकाळी पावसानं तेही हिरावून नेल्यानं बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

धुळे, नंदुरबार अवकाळी पाऊसाचा इशारा

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांचं नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आता जोर धरतेय. आज आणि उद्या हवामान विभागानं धुळे, नंदुरबार अवकाळी पाऊसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. 

पिंपरी चिंचवडच्या काही भागात काल रात्री पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर अधिक नसला तरी काही काळ पावसाने हजेरी लावली. पुणे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे शहरात पाऊस पडला. पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाला असला, तरी काही भागात पावसामुळे नुकसानच झाले आहे.