विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर: गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर महापालिका आणि पोलिसांनी छापा टाकला होता. तिथं गर्भलिंग निदान केल्या जात असल्याचं उघड झालं होतं मात्र त्यावरनं अनेक धागेदोरे नंतर उघडत गेले आणि गर्भपात करण्याचा एक गोरख धंदा उघड झालाय. काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या गर्भलिंग निदान केंद्राच्या करवाईतून अनेक धक्कादायक बाबी आता पुढं येऊ लागल्या आहेत..साक्षी नावाची 19 वर्षीय तरुणी एका डॉक्टरच्या मदतीने गर्भलिंग निदान करायची. त्यानंतर महिलांना गर्भपातसाठी सिल्लोडला पाठवत असल्याचं तपासात उघड झाले आहे.
सिल्लोडला आयुर्वेदिक डॉक्टर असलेला रोशन ढाकरे हा गर्भपात करायचा. हे सगळं बऱ्याच वर्षांपासून सुरू असल्याचं पोलिसांना संशय आहे, गर्भपात करताना ही सगळी मंडळी बरीच काळजीही घ्यायची, आणि यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी एजंट नेमणूक सुद्धा केली असल्याचं आता पुढं आलं आहे.
ज्यांना गर्भलिंग निदान करायचे आहे अशा लोकांना एजंट गाठत होते. त्यानंतर साक्षी थोरात या तरुणीकडे गर्भलिंग निदान करायचे आणि त्यानंतर हेच एजंट गर्भपात साठी त्यांना सिल्लोड ला न्यायचे. सिल्लोड शहरात गेल्यावरही सोबतच्या पुरुषाला दुसऱ्या ठिकाणी थांबवल्या जायचे, आणि फक्त स्त्रीला डॉ ढाकरे याच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन गर्भपात केला जायचा. या सगळ्यासाठी प्रत्येक स्तरावर एजंटची नेमणूक करण्यात आली होती.. येणाऱ्या प्रत्येक स्त्री ला एक पासवर्ड सुद्धा दिला जायचा. तो सांगितल्यावरचं गर्भपात व्हायचा.
गर्भपात झाल्यावर अर्भकाचे तुकडे करून आसपासच्या शेतात पूरले जायचे. तर हॉस्पिटलपासून काही दूर असलेल्या नाल्यात ही यांनी अर्भके फेकली असल्याचा संशय पोलिसांना आहे... पोलिसांनी याबाबत काही पुरावेही जमा केले आहेत.
या ठिकाणी राज्यभरातून स्त्रिया येत असल्याचा पोलिसांना संशय आहे. अगदी संभाजी नगर शहरातही बऱ्याच ठिकाणी हे नेटवर्क पसरले असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक झाली आहे, तर मूळ आरोपी साक्षी जिथून गर्भलिंग निदानसाठी सामान आणायची त्या वाळूजच्या हॉस्पिटलमध्ये छापा टाकण्यात आला. तिथूनही 3 लोकांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश यादव यांनी दिली. या समोर आलेल्या घटनांमुळे या प्रकरणाची पाळंमुळं चांगलीच रुजली असल्याचं स्पष्ट झालं आहे.