रायगड: दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमध्ये असलेल्या ३१ जणांपैकी ३० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकास जिवदान मिळाले. मृतांपैकी सर्वच्या सर्व ३० जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनेतील सर्वांचे मृतदेह हाती लागल्याने मदत आणि शोधकार्य अंतीम टप्प्याकडे पोहोचले आहे.
दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी मिनीबसमधून सहलीसाठी मोठ्या आनंदाने आणि उत्साहात निघाले. सकाळी सातच्या सुमारास निघालेल्या या कर्मचाऱ्यांनी खेडमध्ये नाश्ता केला आणि फोटोसेशनही झालं. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. महाबळेश्वरच्या दिशेने जात असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मातीच्या ढिगाऱ्यावरुन बस घसरली आणि थेट ३०० मीटर खोल दरी कोसळली.
दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.