मुंबई : ST employees strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आज शेवटची संधी देण्यात आली आहे. कामावर रुजू न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांची आजपासून बडतर्फी करण्यात येणार आहे. कामावर रुजू होण्यासाठी आज अंतिम मुदत दिली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची तपासणी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत. (ST strike - Maharashtra Government Action warning)
राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मुद्दावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. काही कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यांना कामावर रुजू होण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आजच्या दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली आहे. आज कामावर रुजू न झाल्यास उद्यापासून त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
नियमानुसार निलंबन, बडतर्फीसारख्या कारवाईला उद्यापासून सुरुवात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर अद्यापही ठाम असून तिढा सुटलेला नाही. मात्र, न्यायालयाने संप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महामंडळाने इशारा दिला आहे. दरम्यान, कारवाई होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आवाहन महामंडळाकडून केलं जाते आहे.
कोल्हापुरात एसटी कर्माचाऱ्यांचा संप सुरुच आहे. जिल्ह्यातील 600 एसटी बसेस अद्याप आगारातच आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम आहे. गेल्या 47 दिवसांपासून हा संप सुरु आहे. ऐन सुट्टीच्या दिवसांत एसटी बंद असल्यानं कोल्हापूर विभागाचं 15 ते 18 कोटींचं नुकसान झालंय.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी अल्टिमेटम दिल्यानंतरही एसटी कामगारांच्या संप सुरुच आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरूळपीर या चारही आगारांतून एकही बस बाहेर पडलेली नाही. चारही आगारांतील एकूण 969 कामागरांपैकी 187 कर्मचा-यांवर आतापर्यंत निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र आंदोलक विलिनीकरणावर ठाम आहेत.