मुंबई : राज्यावरील संकट वाढत आहे. राज्यात आज देखील कोरोना रुग्णांची वाढ ही चिंताजनक आहे. कारण आज तब्बल 14 हजाराहून अधिक रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाचं थैमान पुन्हा एकदा पसरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोना रूग्णसंख्येत उच्चांकी वाढ पाहायला मिळाली. आज कोरोनाचे तब्बल १४३१७ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात कोरोनाच्या ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज १,०६,०७० अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आज राज्यात ७,१९३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या राज्यात ४,८०,०८३ व्यक्ती होमक्वारांटाईन आहेत तर ४,७१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईन आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना म्हटलं की, धोका वाढत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे. मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु केलं आहे. अनेक जण टेस्ट करुन घेण्यासाठी नकार देत आहेत. होम क्वारंटाईनची मुभा दिली आहे. पण ८० टक्के लोकांना लक्षणं नसल्याचे दिसत आहे. पण त्याचा दुष्परिणाम होत आहे. कुटुंब बाधित होत आहे. एखादा जरी गंभीर झाला तर जबाबदारी कोणाची? टेस्ट करुन घेताना घाबरु नका.' नियम पाळण्याचं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, धुळे, नाशिक, कल्याण-डोंबिवली या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने प्रशासनाने आता निर्बंध लागू करण्याची सुरुवात केली आहे.