मुंबई : मार्च महिन्यातच ऊष्णतेचा पारा वाढला आहे. अशात आता पुढचे तीन ते चार दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र असेल, असा इशारा देण्यात आला आहे. दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाचे चटके बसतात तर कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये चाळीशी गाठतो. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडयातच राज्यातील बहुतेक भागांत पारा 40 अंशांवर गेलाय.
दरम्यान, यंदाचा मान्सूनही सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरासरीच्या 89 ते 113 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
परभणीत सर्वाधिक तापमान
परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. जिल्ह्यात 41.2 अंश तापमानाची नोद झाली आहे. हे यंदाच्या मोसमातलं ,सर्वाधिक तापमान ठरलंय. पुढील काही दिवस या तापमानात अशीच वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना, विशेष काळजी घ्यावी अति महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत.
नागपूरम्ये शाळा सकाळच्या
उन्हाचा प्रकोप वाढत असताना नागपुरमधील शाळा सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिलाय. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शाळा सुरू ठेवल्या जाणारेत. पहिली ते नववीच्या शाळा सोमवार ते शनिवार असतील. तर रविवारी एच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येईल
उष्माघाताने पक्षांचा मृत्यू
राज्यात उष्माघातानं पक्षांचाही मृत्यू व्हायला लागला आहे. शिरूरमध्ये वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. दररोज शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडतायत. आधीच खाद्य महागल्यानं पोल्ट्री व्यावसायिक त्रस्त होते त्यात आता हे नवं संकट उभं ठाकलंय.
वाढत्या उन्हामुळे प्राण्यांचीही लाहीलाही होतेय. त्यामुळेच नागपुरातल्या महाराजबागेत प्राण्यांसाठी कुलरची व्यवस्था केलीय. प्राण्यांच्या अंगावर दिवसातून तीनदा पाण्याचे फवारे मारले जातायत. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जातेय.