रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई - करमाळी अशी धावणारी तेजस एक्स्प्रेसला कायमचा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तेजस एक्स्प्रेसची निर्मिती थांबवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. तेजसऐवजी नव्या दमाची ट्रेन १९ नावाची गाडी बांधण्यात येणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. डिस्ट्रीब्युटेड पॉवर रोलिंग स्टॉक या नव्या प्रकारच्या बांधणीनुसार ही गाडी असणार आहे. ट्रेन १९ ही ट्रेन १८ किंवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची पुढची आवृत्ती असणार आहे. या गाडीत स्लीपर कोचेसही असतील.
डीपीआरएस प्रणालीमुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वेग गाठणे आणि तातडीने वेगावर नियंत्रण आणणे शक्य होईल. देशात सध्या दोन तेजस गाड्या धावत आहेत. त्यापैकी एक मुंबई - करमाळी मार्गावर तर दुसरी चेन्नई - मदुराई या मार्गावर आहे. चाचण्यांच्या दरम्यान तेजसने १८० ते २०० किमी प्रतितास हा टप्पा गाठला आहे. नव्याने दाखल झालेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा हाच वेग आहे. वेग वाढवणारी डीपीआरएस यंत्रणा राजधानी आणि शताब्दी गाड्यांनाही बसवण्याचा विचार रेल्वे करत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या मांडवी तसेच कोकणकन्या एक्स्प्रेस या कोकणवासीयांच्या सर्वाधिक पसंतीच्या रेल्वे गाड्या काल सोमवार १० जूनपासून निळ्या पारंपरिक रंगाची कात टाकून नव्या-कोर्या लाल-करड्या रंगसंगतीत ‘लालपरी’च्या रुपात धावताना दिसल्यात. रेल्वेने जुने रंग बदलण्याचा निर्णय घेतल्याने आता या गाड्या आधुनिक एलएचबी डब्यांसह धावत आहेत. आधीच्या आयसीएफ कोचच्या तुलनेत अधिक लांबीच्या, अधिक प्रवासी क्षमता आणि अधिक सुरक्षितता या नव्या श्रेणीतील गाड्यांत असणार आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावदरम्यान या दोन्ही गाड्या धावत आहेत. आधीच्या तुलनेत या डब्यांची लांबी अधिक असून, त्यामुळे त्यांची प्रवासी क्षमताही अधिक आहे. यामुळे फलाटाची लांबी तसेच नव्या डब्यांची प्रवासी क्षमता, त्यांची लांबी यांचा मेळ बसविण्यासाठी एलएचबी डब्यांसह धावणार्या या दोन्ही गाड्या सोमवापासून पूर्वीच्या २४ ऐवजी २२ डब्यांसह धावत आहेत. दरम्यान, या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात धावतील. त्यानंतर १ सप्टेंबर २०१९ पासून त्या कायमस्वरुपी धावणार आहेत.