पाहा भारतीय बनावटीच्या कोरोना टेस्टिंग किटची 'जननी' आहे तरी कोण...

तिच्या प्रयत्नांना समस्त मानवजातीचाच सलाम....  

Updated: Mar 29, 2020, 08:59 PM IST
पाहा भारतीय बनावटीच्या कोरोना टेस्टिंग किटची 'जननी' आहे तरी कोण... title=
संग्रहित छायाचित्र

पुणे : 
''कधी शारदा तू,
कधी लक्ष्मी तू,
कधी भाविनी वा,
कधी रागिणी.
सहस्त्रावधी,
सूर्य झुकतात जेथे,
स्वयंभू अशी,
दिव्य सौदामिनी.... 
तू आहेस ना....''

'आनंदी गोपाळ' या चित्रपटातील गीताच्या ओळी ऐकताना अंगावर शहारा येतो. स्त्रीच्या विविध रुपांचं दर्शन पडद्यावर पाहायला मिळतं. अशाच एका रुपाने सध्या संपूर्ण मानवजातीवर जणू उपकारच केले आहेत. हे उपकार आहेत माणुसकीचे, एका मातेचे, तिच्या मातृत्त्वाचे, जबाबदारीचे आणि समर्पक वृत्तीचे.

Coronavirus कोरोना व्हायरसची दहशत सर्वत्र झपाट्याने पसरत असतानाच एका गर्भवती व्हायरोलॉजिस्ट आईने अशी काही किमया केली की, संपूर्ण देशच त्यांचे आभार मानत आहे. ही गोष्ट आहे 'माय लॅब'च्या व्हायरोलॉजिस्ट आईची. मीनल डाखवे भोसले असं त्यांचं नाव. पुण्यातील माय लॅब या कंपनीतील संशोधन आणि विकास विभागाच्या त्या प्रमुख.

भारतात कोरोनाचा धोका वाढल्यानंतर रुग्णांची चाचणी करण्यासाठीचे टेस्टिंग किट कमी पडू लागले. तेव्हाच माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स या कंपनीने परिस्थिती पाहता एक मोठं आव्हान स्वीकारत अवघ्या सहा आठवड्यांमध्ये त्यांनी कोरोना टेस्टिंग किट तयार करण्याची किमया केली. 

किट तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्वाधिक योगदान होतं व्हायरोलॉजिस्ट मीनल डाखवे भोसले यांचं. गरोदर असतानाही विक्रमी वेळेत त्यांनी पूर्ण भारतीय बनावटीचं हे टेस्टिंग किट तयार केलं. 18 मार्चला टेस्टिंग किटला या जगात आणणाऱ्या मीनल यांनी त्यानंतर काही तासांनीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

डाखवे यांची ही कामगिरी पाहता पाहता सर्वदूर पोहोचली आणि त्यांची उद्योगजगतापासून वैद्यकिय क्षेत्रापर्यंत सर्वांनीच वाहवा केली. अनेकांनी त्यांचे आभार मानले.