Nagpur Rain: नागपुरात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसाने कहर केला आहे. 2 तासांत 90 मिमी पाऊस पडल्याने महापूर आला.अंबाझरीमध्ये पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलं. या पुराच्या पाण्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. नागपूर शहरात आज झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना 10 हजारांची तर दुकानदारांना 50 हजारांपर्यंत मदत जाहीर करण्यात आलेय.
अंबाझरीमध्ये अनेक रस्ते, घरं पाण्याखाली गेली. नागपूर शहरातल्या पूरस्थितीचा आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत आढावा बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नुकसानग्रस्तांना 10 हजारांची तर दुकानदारांना 50 हजारांपर्यंत मदत जाहीर केली आहे.
नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. या बैठकीला कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, संदीप जोशी, तसेच इतरही लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर उपस्थित होते.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवघ्या 4 तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे रस्ते, पुलांची क्षती झाली. नाल्याजवळच्या भींती पडल्या, घरात पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत 10 हजार रूपये देण्यात येईल. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. जेथे दुकानांची क्षती झाली, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देणार. टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी 10 हजारापर्यंत मदत देण्यात येईल. शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. पोलिस विभाग सुद्धा सज्ज आहे.
आज या स्थितीनंतर वीज बंद करण्यात आली होती, ती बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत कारण, तेथे पाणी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. तेथे ओलावा कायम आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. सकाळपर्यंत ती सुरु करण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पहिल्या तीन तासातच लोकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. एनडीआरएफ, एसडीआरएफचा यात मोठा वाटा आहे. रिस्पॉन्स टाईम हा चांगला होता आणि त्याचे कौतूक केले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.