नाशिक : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या ११ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत ३ अधिकारी दोषीही आढळले आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी आपला कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे.
तुकाराम मुंढे यांनी चौकशीत दोषी आढळलेल्या ३ कामचुकार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. उत्तर देण्यासाठी या अधिकाऱ्यांना वेळही देण्यात आली आहे. लवकरच या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
'नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केलं जाईल', असा विश्वास मुंढेंनी नाशिककरांना दिला.
'कोणताही नागरिक, पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी कर्मचाऱ्याचे आहे, त्यात हलगर्जीपणा झाला तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल.', असा इशारा मुंढेंनी दिला.
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्याला दणका दिला होता. तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच पालिकेत एक बैठक बोलावली होती. याच बैठकीत गणवेश परिधान करुन न आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट बैठकीतून बाहेर काढलं.