पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे यांनी बैठकीनंतर आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा असे आवाहन त्यांनी करत आजपर्यंत जे बळी गेले त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. ताबडतोब तोडगा काढा नाहीतर उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यकर्त्यांना महाराष्ट्राने निवडून दिलंय. बाकीच्या समाजाला न्याय मिळाला मग मराठा समाजाला का नाही ?मराठा समाजाचा आता किती अंत बघायचा ? असा प्रश्न उदयनराजेंनी यावेळी केला. मागून पण हक्क मिळत नाही. कारण नसताना तुम्ही न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवता, कायदा बनवणारे, न्याय देणारेसुद्धा माणसंच आहेत मग त्यांना या तीव्र भावना समजत का नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मराठा रस्त्यावर येतो त्याला कारणीभूत कोण ? तुम्ही तज्ञ लोक आहात. बसा आणि काय असेल तो निर्णय लवकरात लवकर घ्या. आजपर्यंत जे बळी गेले त्याला जबाबदार कोण ? तो माणूस तुम्ही परत आणून देणार का ? एखादा माणूस जेव्हा जीव द्यायला जातो तेव्हा त्याच्यावर काय मानसिक ताण असेल याचा विचार करा. जो माणूस स्वत:चा जीव घेऊ शकतो तो दुसऱ्याचाही घेऊ शकतो याचा विचारही करायला हवा असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस भूमिका न घेणाऱ्यांना जागतिक पातळीवरचा संयमाचा पुरस्कार यांना द्यायला हवा असेही ते म्हणाले.