मुंबई : मुंबई महापालिका कर्मचा-यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला आहे. उद्या सायंकाळी ६.३० वाजता वर्षा बंगल्यावर मुंबई मनपा कर्मचारी संघटना समन्वय समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. एक लाख मनपा कर्मचाऱ्यांच्या बोनस सानुग्रह अनुदान बाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. कर्मचारी संघटना समन्वय समिती आणि पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्यात बैठक होवूनही निर्णय होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता बैठक होणार आहे.
मागील वर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह बोनस देण्यात आला होता. 2 वर्षाआधी 14,500 रुपये बोनस देण्यात आला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यंदा अधिक बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. यंदा 20 हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बोनसबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत.
यंदा 40 हजार रुपये बोनसची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.