मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा सदस्यत्त्वाच्या शपथविधीवेळी झालेला वाद ताजा असतानाच आता यामध्ये आणखी नवी भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत उदयनराजे यांना मागच्या रांगेत बसावे लागल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो.शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत असल्याचे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
'दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, भाजप आणि संभाजी भिडे शांत का?'
तत्पूर्वी संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरुन भाजपला चांगलेच झोडपले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अदयाप घोषणा नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो.
शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे.
जाहीर निषेध— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 23, 2020
'भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात'
काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.