मुंबई: विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवाजीराव देशमुख यांचा मुलगा सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून शिवाजीराव देशमुख यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सांगलीतल्या कोकरुड येथे मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी सांगली जिल्ह्यात झाला. ते १९७८, १९८०, १९८५ आणि १९९९० या चारवेळेला विधानसभेवर निवडून गेले होते. १९९६ ते २००२ या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या विधान परिषदेचे सभापतीपद भुषविले होते. राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅटट्रिक देशमुख यांनी केली होती.
काँग्रेसशी एकनिष्ठ असणारा नेता आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले नेते अशी त्यांची ओळख होती. शिराळा मतदारसंघातुन त्यांनी सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसच्या सत्तेत त्यांनी गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अश्या जवळ पास सर्व अनेक महत्वाची खात्यावर त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. १९९२ ते १९९६ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यात मंत्री अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. १९९६ साली दोन्हीपैकी एक जबाबदारी स्वीकारण्याबाबत पक्षाचा निर्णय झाल्यावर, त्यांनी पक्ष कार्य करण्याचे ठरवले. १९९६ मध्ये त्यांनी विधानसभा लढवली नव्हती. १९९९ नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सभापतीपद भूषवले होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची फार मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.