मुंबई : जमावबंदी आदेश असतानाही लोक गर्दी करत आहेत. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कलम १४४ म्हणजे जमावबंदीचा भंग झाला तर पोलीस भारतीय दंडविधान कलम १८८ नुसार गाड्या ताब्यात घेऊ शकतात. लोकांनाही ताब्यात घेऊ शकतात. पण ती वेळ आणू नका, असा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.
झी २४ तासशी बोलताना आयुक्त फणसळकर यांनी जनतेला विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. मुंलुंड टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली. मुंबईबाहेर गेलेले मुंबईतील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत परतत आहेत. तसेच भाजी आणि अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोक घराबाहेर पडले आहेत. मात्र लोकांनी ३१ मार्चपर्यंत बंधन पाळायला हवे. विनाकारण घराबाहेर पडल्यास आणि जमावबंदीचा आदेश मोडल्यास पोलीस भारतीय दंडविधान कलम १८८ नुसार कारवाई करू शकतात. पण लोक आपलेच आहेत, त्यामुळे कठोर कारवाई करायला लावू नका. पण आदेशाचा भंग झालाच, तर गाड्या जप्त करून लोकांनाही ताब्यात घ्यावं लागेल, असा इशारा फणसळकर यांनी दिला. पोलिसांना मास्क दिले आहेत आणि त्यांनी ते लावावेत अशा सूचनाही केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकल रेल्वे सेवा, बेस्ट बस आणि मेट्रोसेवा बंद झाल्यानं रोज गजबजणारी ठिकाणं आज सुनीसुनी वाटत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी सेवा मात्र सुरु असल्यानं रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही प्रमाणात दिसत आहे. मुलुंड चेकनाक्यावर तर खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात दिसल्यानं जमावबंदी लागू केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप झाला नसल्याचं चित्र सोमवारी सकाळी दिसत होतं.
We are issuing orders to disburse the crowds at various checkpoints of Mumbai including Mukund and others. Police can take action under section 144: Maharashtra Health Minister Rajesh Tope https://t.co/VvH1JW1i3n
— ANI (@ANI) March 23, 2020
सोमवारी सकाळी दिसलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली. कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यावर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.