मुंबई : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्याविरोधातल्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंतची मुदत डीएसकेंनी उच्च न्यायालयाकडून मागून घेतली होती.
मात्र या मुदतीत डीएसके यांनी 50 कोटी रुपये जमा न केल्याचं सरकारी वकिलांनी 25 जानेवारीच्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यावर न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सहराप्रमाणे तुम्ही तुमची अवस्था करून घेऊ नका असे खडे बोलही न्यायालयानं त्यावेळी डीएसकेंना सुनावले होते.
डीएसकेंना कोठडीत पाठवायला एक क्षणही पुरेसा आहे असा सज्जड दमच, न्यायालयानं दिला होता. दरम्यान डीएसकेंच्या खात्यात 51 कोटी जमा केल्याची हमी त्यांच्या वकिलांनी त्याचवेळी न्यायालयाला दिली होती. यावर न्यायालयाकडून डीएसकेंना 5 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला.