Dry Day In Maharashtra Latest News: सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आतापर्यंत देशभरातील चार टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आता येत्या सोमवारी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार आहेत.
मुंबईत येत्या 20 मे रोजी सर्व सहा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. यात उत्तर मुंबई मतदारसंघ, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ, उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघ, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मुंबई मतदारसंघ या सहा मतदारसंघाचा समावेश आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईतील दारुची दुकाने आणि बार तीन दिवस बंद राहणार आहेत.
मुंबईसह परिसरातील दारुची सर्व दुकाने, आस्थापना 18 ते 20 मे पर्यंत बंद असतील. मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता दारुची दुकाने आणि बार बंद होतील. यानंतर 19 मे रोजी दिवसभर ही दुकाने बंद असणार आहे. तर 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता ही दुकाने पुन्हा सुरु होतील. प्रशासनाने खबरदारी म्हणून हा आदेश काढला आहे. यामुळे मद्यप्रेमींच्या घशाला कोरड पडणार आहे.
मुंबईतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 18 ते 20 मेपर्यंत ड्राय डे ची घोषणा केली आहे. या काळात तळीरामांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची अप्रत्यक्ष अपेक्षा आहे. त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात या आठवड्याच्या अखेर सलग तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार असल्याने मद्यप्रेमींच्या घशाला कोरड पडणार आहे. यासाठी अनेक मद्यप्रेमी हे अगोदरच तजवीज करत असल्याचे दिसत आहे.