मुंबई: राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण (hunger strike) मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.
राज्यसरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर त्याचे मिनिट्स आणले. या मागण्या किती दिवसात आणि कसा पद्धतीने पूर्ण करणार याचा आराखडाही आणला.
राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांशी आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलून काही निर्णय घेतले. त्याची माहिती देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अमित देशमुख, खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आझाद मैदान गाठले. या मंत्र्यांनी सुमारे अर्धा तास संभाजी राजे यांच्याशी चर्चा केली.
या नेत्यांच्या भेटीनंतर आणि सरकारने मान्य केलेल्या मागण्यांबाबत समाधान मानत संभाजीराजे यांनी आपले आमरण उपोषण समाप्त केले.