आत्महत्या की घातपात? जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचं शेवटचं WhatsApp Status चर्चेत

जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आज सकाळी  तळोजा ते पनवेल  दरम्यान रेल्वे लाईन वर केली आत्महत्या, सकाळी 9 वाजताच्या सुमारास पनवेल लोहमार्ग पोलिसांना मिळाली माहिती..

Updated: Mar 29, 2023, 03:26 PM IST
आत्महत्या की घातपात? जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचं शेवटचं WhatsApp Status चर्चेत title=

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा माजी बॉडीगार्ड वैभव कदम (Vaibhav Kadam) याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हार्बर मार्गावरील (Harbour Railway) तळोजा ते पनवेलदरम्यानच्या रेल्वे लाईनवर त्याचा मृतदेह आढळला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास पनवेल लोहमार्ग पोलिसांना (Lohmarg Police) याची माहिती मिळाली. लोहमार्ग पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन आता शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना वैभव कदम हे त्यांचे बॉडीगार्ड होते. सध्या ते मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात हवालदार पदावर कार्यरत होते. आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण (Anant Karmuse Case) करण्यात आल्याचं प्रकरण गाजलं होतं. या मारहाणप्रकरणात कदम यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. 

वैभव कदम यांचं स्टेट्स
वैभव कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. पण त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेट्स (WhatsApp Status) ठेवलं होतं. त्यात त्यांनी 'पोलीस आणि मीडियाला एकच विनंती मी आरोपी नाही', असं लिहिलं होतं. 

मोहित कम्बोज यांची पोस्ट
दरम्यान, भाजप नेते मोहित कम्बोज यांच्या एका ट्विटने खळबळ माजली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय,  'हेडकॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम एसपीयू मुंबई आज सकाळी मृतावस्थेत सापडले! महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या ते संरक्षणात होते आणि एका प्रकरणात आरोपी होते. एका हाय प्रोफाइल प्रकरणात वैभव कदम साक्षीदार होणार होते. इट इज अ क्लिअर कट मर्डर नॉट सुसाइड! मी यू एक्स्पोज करणार' असं कम्बोज यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे 

याशिवाय मोहित कम्बोज यांनी आणखी एक ट्विट केलं असून त्यात त्यांनी वैभव कदम यांच्या शेवटच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. या फोटोबरोबर कम्बोज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलंय.

वैभव कदम यांची ही शेवटची पोस्ट आहे. 
कोण आहे आरोपी?
सिस्टम कोणाल वाचवू पाहातंय?
आम्ही पुन्हा एक  #SushantSinghRajput होऊ देणार नाही
हत्येला नेहमीच आत्महत्येचा चेहरा दिला जाऊ शकत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात निष्पक्ष तपास करायला हवा असंही मोहित कम्बोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.