राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता

एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवण्यात होती.

Updated: Nov 27, 2019, 03:37 PM IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता title=

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपकडून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भाजपकडून सत्तास्थापनेसाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला झुकते माप दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. या सगळ्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळेच आता भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली केली जाऊ शकते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आता राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची वर्णी लागू शकते. गेल्यावर्षीच कलराज मिश्र यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपालपदाचा कारभार सोपवण्यात आला होता. तत्पूर्वी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. 

माझा दादा परत आलाय - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. यानंतर शिवसेना आणि भाजप सहजपणे सरकार स्थापन करतील, असे वाटत होते. मात्र, शिवसेनेने अनपेक्षित भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संख्याबळाअभावी कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आले नव्हते. शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी जादा अवधी देण्याची मागणी राज्यपालांकडे केली होती. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळून लावली होती. यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 

एकनाथ खडसे यांचा भाजपवर गंभीर आरोप

यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरु असताना २२ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यासाठी एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवण्यात होती. यावेळी राजभवनातून गुप्तपणे हालचाली झाल्या होत्या. त्यामुळे विरोधकांसह अनेकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.