मुंबई: राज्यातील महाविद्यलयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत गाणे बंधनकारक असेल, असा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
या निर्णयानंतर राज्यातील सर्व महाविद्यालयांना नियमाच्या अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात येणार आहेत. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यास सर्वच महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सामंत यांनी पुढे नमूद केले. यापूर्वी सरकारने महाराष्ट्रातील शाळा आणि चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत गाणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, वास्तुविशारद महाविद्यालये, डी फार्मसी आणि बी फार्मसी अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दररोज राष्ट्रगीत सादर करावे लागणार आहे.
Maharashtra minister Uday Samant: Maharashtra government to make singing national anthem in colleges compulsory from 19th February. pic.twitter.com/c4eiPLxLih
— ANI (@ANI) February 12, 2020
विद्यार्थ्यांमध्ये देशभावना जागृत व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. तरुणपिढी अलीकडे तंत्रज्ञानाच्या मागे धावताना भारतीय संस्कृतीचा मूळ पाया विसरत चालली आहे. अशावेळी काही समाजकंटक तरुणांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भरकटणाऱ्या तरुणांमध्ये देशभावना जागृत करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात राष्ट्रगीत सादर करणे बंधनकारक केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.