Maharashtra Weather News : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून काहीसा तुरळक बरसणारा पाऊस आता खरोखरच माघार घेतो की काय असं वाटत असताना संपूर्ण देशात पुन्हा एकदा पावसासाठी पूरक वातारण निर्मिती होतीना दिसली. अगदी मुंबई शहर आणि उपनगरसुद्धा इथं अपवाद ठरलं नाही. 15 ऑगस्टची सकाळ देशात एक नवी पहाट आणि हवामानाचं नवं रुपही घेऊन आली असं म्हणावं लागेल. कारण राज्याच्या काही भागांमध्ये पावसाअभावी तापमानाचा आकडा वाढत असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसाचे ढग दाटून आल्याचं पाहायला मिळत आहे.
पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. असं असलं तरीही राज्यात पावसाची उघडीप अनेक भागांमध्ये पाहायला मिळेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
राजस्थानपासून बंगालच्या उपसागरामध्ये पूर्व मध्य क्षेत्रापर्यंत मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तिथं केरळ किनारपट्टी क्षेत्रालगत असणाऱ्या अरबी समुद्राच्या भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळं काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटून येण्याची चिन्हं नाकारता येत नाही, पण पर्जन्यमान मात्र तुलनेनं कमी असेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
मागील 48 तासांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलीच उघडीप दिल्यामुळं आणि मोठी उसंत घेतल्यामुळं सूर्यनारायणाचं दर्शन झालं. तर, अनेक भागांमध्ये तापमानाच लक्षणीय वाढ झाली. सोलापूरसह राज्याच्या काही भागांमध्ये तर तापमान 35 अंशांपलिकडे पोहोचल्यामुळं ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळांनी अनेकांनाच हैराण केलं. ऑगस्ट महिन्यात हे चित्र कायम राहणार असून, या महिन्याच्या अखेरीस पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितल्यामुळं सध्या श्रावणसरीच हजेरी लावणार हे स्पष्ट होतंय.