Salman Khan Home Firing Acused End His Life: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपाअंतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने तुरुंगात आत्महत्या केली आहे. या आरोपीचं नाव अनुज थापन असं आहे. अनुजने कोठडीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला उपचरासाठी मुंबईतील जीटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या सलमान खानच्या गॅलेक्स येथील निवासस्थानाबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या. यापैकी 2 गोळ्या इमारतीच्या भिंतीला लागल्या होत्या. या हल्ल्यानंतर सलमानची तसेच त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 16 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधील भूज जिल्ह्यातून सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली. ,त्यानंतर या आरोपींच्या चौकशीमध्ये त्यांना शस्त्रं पुरवाणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. याच दोन आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली.
सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तूल तसेच 38 जिवंत काडतुसे पुरविणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने 25 एप्रिल रोजी अटक केली. पंजाबमधील वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान सोनू सुभाष चंदर (वय 37) आणि अनुज थापन (वय 32) या दोघांना अटक करण्यात आली. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एकूण अन्य 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून गुजरात येथून गोळीबार करणाऱ्या दोन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली होती. गोळीबार करण्यासाठी वापरलेली 2 पिस्तूल आणि सुमारे 17 काडतुसे पोलिसांनी पाणबुड्यांच्या साह्याने सुरतजवळ तापी नदीतून शोधून काढली.
शस्त्र मिळाल्यानंतर विकी आणि सागरला ही शस्त्र 15 मार्चला पनवेलमध्ये पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी दोन्ही प्रमुख आरोपींना शस्त्रे पुरविणाऱ्यांचा शोध सुरु केला. आरोपींची चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे बिश्नोईच्या गावातूनच ही शस्त्रे पनवेलमध्ये मागवण्यात आल्याचं समजलं. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंजाबमध्ये जाऊन सोनू आणि अनुज या दोघांना ताब्यात घेतले. अनुजवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून तो बिश्नोईसोबत थेट संपर्कात होता अशी माहिती समोर आली. याच अनुजने आज आत्महत्या केली.