मेट्रो 3 थेट लोकलला कनेक्ट होणार, 'या' दोन रेल्वे स्थानकांना जोडणार, असा असेल मार्ग

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आता मेट्रोच्या लोकार्पणासाठी नवी तारीख समोर आली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 20, 2024, 11:43 AM IST
मेट्रो 3 थेट लोकलला कनेक्ट होणार, 'या' दोन रेल्वे स्थानकांना जोडणार, असा असेल मार्ग title=
Mumbai Metro Aqua Line 3: BKC to Aarey Phase 1 operations set to start from october

Mumbai Metro 3: मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळ पसरवण्यात येत आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांआधी मुंबई मेट्रो 3 चे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो 3 या मार्गिकेचे  ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. 

मुंबईकर 2014 पासून भूमिगत मेट्रोतून प्रवास करण्यास उत्सुक आहेत. आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात 10 स्थानकांचा समावेश असून 12 किमी लांबीचा मार्ग आहे. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी ही मार्गिका लोकांसाठी खुली होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील स्थानके ही 22 ते 28 मीटर जमिनीखाली अशून मुंबई विमानतळाजवळील सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहेत. दरम्यान मेट्रो -3 चा दुसरा टप्पा पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मेट्रो-3 मार्गिकेचे उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 3-5 दरम्यान होण्याची शक्यता आहे. मेट्रो-3 च्या उद्घाटनाव्यतिरिक्त केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ठाणे रिंग रोड मेट्रोसाठी पंतप्रधान पायाभरणी करतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमादरम्यान इतर अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 33.5 किमी लांबीचा भुयारी मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गिकेवर एकूण 27 स्थानके असून फक्त पहिल्या टप्पात 10 स्थानकातूनच मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमुळं मोठ्या प्रमाणात शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसंच, प्रवाशांचा प्रवासाचा वेळही वाचणार आहे. रस्त्यावरील सहा लाख वाहनांची संख्या कमी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. 

मेट्रो 3 मार्गिकेला मेट्रो 1,2,6 आणि 9 जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावरील चर्चेगट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोबत जोडली जाणार आहे. तसंच, मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे. 

मेट्रो-3 वर अशी असतील स्थानके

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.

पहिल्या टप्प्यातील 10 स्थानके

आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतराराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, सहार रोड, विमानतळ टर्मिनल 1, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी